मुख्य मजकुराकडे जा

कान्होराज महाराज

वारकरी संप्रदायातील थोर संत, ज्यांच्या तपश्चर्येने रेणुका देवी प्रसन्न झाली.

पेंद्या म्हणे ऋषेकेशी । आरुष बोबडे परियेसी ॥ यारे यारे अवघेजन । गाऊ हरिनाम कीर्तन ॥ कान्होपाठक बागडा । नाचे वैष्णवा पुढा ॥

संत कान्होराज महाराज

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर गावी राहणारे कान्होराज (कान्होपाठक) हे वारकरी संप्रदायातील थोर संत होते. ते श्री ज्ञानेश्वर महाराजांना अत्यंत आपुलकीने व आदराने “काका” म्हणत असत. कान्होपाठक हे यजुर्वेदी कुळातील ब्राह्मण होते व त्यांना राजमान्यताही होती.

कान्होपाठक सिद्धयोगी होते. श्री ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या वेळी संत नामदेव महाराजांना दुःखाचा गहिवर आवरेना, त्यामुळे नामदेव कीर्तन करू शकले नाहीत. तेव्हा सर्व संतांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचे कीर्तन कान्होपाठक महाराजांना करण्यास सांगितले.

सद्गुरु नागेश यांनी दृष्टांत देऊन कान्होराजांना जंगलात जाऊन साधना करण्याची आज्ञा केली. त्यानुसार ते केंदूर गावाजवळील पिंपळखोरे येथील जंगलात ओढ्याकाठी एका शिळेवर बसून तपश्चर्या करीत; त्यातून त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या. पुढे ते गुरुगृही वेदांत अध्ययनासाठी गेले आणि कुशाग्र बुद्धी व एकपाठी असल्याने अल्प काळातच अध्ययन पूर्ण केले.

पुढे आई-वडिलांनी त्यांचा विवाह लावून दिला. अतिशय सुशील व गुणवान सुनेमुळे सासू-सासरे सुखावले आणि संसार सुरळीत चालू झाला. परंतु जन्मतःच विरक्त असलेले कान्होराज संसारात कसे रमणार? ते पुन्हा पिंपळखोरे येथे जाऊन साधना करू लागले आणि उरलेल्या वेळात समाजात धर्माचरण व शास्त्रमार्गाचा उपदेश-प्रचार करीत. असे १०-१२ वर्षे गेल्यावर आई-वडील व आप्तजनांच्या आग्रहामुळे त्यांना दुसऱ्या विवाहास सामोरे जावे लागले. दोन्ही पत्नी एकत्र अत्यंत आनंदाने राहत असल्याने त्यांचा प्रपंच सुखात चालला. कालांतराने मातापित्यांचे छत्र हरपले. सद्गुरुकृपेने संसारात राहूनही शुद्ध शास्त्राप्रमाणे आचरण ठेवून त्यांनी समाजापुढे आदर्श ठेवला.

कान्होराज महाराजांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या रेणुका देवीची कथा — ती कन्हेरसर येथे “यमाई” म्हणून कशी प्रकटली — यमाई देवी पानावर वाचा.

केंदूर येथील समाधी मंदिर

श्री संतश्रेष्ठ कान्होराज महाराज केंदूर गावी ज्या वाड्यात राहत होते, तेथे त्यांची समाधी असलेले मंदिर आहे. तेथे दर वर्षी पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो.

वार्षिक उत्सव (केंदूर)

  • महाशिवरात्र – महाराजांची जयंती
  • कोजागिरी पौर्णिमा
  • मार्गशीर्ष वद्य चतुर्थी ते त्रयोदशी – कान्होराज महाराज पुण्यतिथी उत्सव (पुण्यतिथीचा दिवस एकादशी)
  • पंढरपूर पायी वारी सोहळा
  • प्रत्येक एकादशीला काकडा भजन आणि रात्री हरिजागर

केंदूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी

केंदूरला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून पुरातन काळापासून केंदूरचे उल्लेख आढळतात. मस्तानीला श्रीमंत बाजीराव पेशवे (पहिले) यांनी इनाम म्हणून केंदूर – पाबळ – लोणी ही गावे दिली होती. मस्तानीची कबर पाबळ येथे आहे. पाबळ विषयी वाचा

पत्ता व भेटीची वेळ

पत्ता
कान्होराज महाराज देऊळ वाडा मंदिर, केंदूर, महाराष्ट्र ४१२४०३
भेटीची वेळ
यात्रेकरू सकाळी ९ ते १ आणि संध्याकाळी ४ ते ७ या दरम्यान भेट देऊ शकतात. मंदिर १ ते ४ दरम्यान बंद राहील. ही वेळ केंदूर येथील कान्होराज महाराज मंदिराची आहे; कन्हेरसर येथील यमाई मंदिराची नाही.
नकाशावर पहा (Google Maps) (नवीन टॅबमध्ये उघडते)

साहित्य

कृपया कान्होपाठक महाराजांनी रचलेले साहित्य डाउनलोड करा.

  • संत कान्होराज (कान्होपाठक) महाराज – साहित्य

    PDF · 856 KB