|| श्री यमाई माता प्रसन्न ||
यमाई देवी कन्हेरसर येथे अवतीर्ण कशी झाली?
ही कथा आहे केंदूर (ता. शिरूर) येथील संत कान्हूराज महाराजांची, ज्यांना श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सानिध्याने पावन केले, आणि त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या रेणुका देवीची.
समाधी अवस्थेत तल्लीन असताना रेणुका देवीने कान्हूराज महाराजांना दर्शन दिले व वर दिला. “तुझे दर्शन मला सर्व सदाकाळ व्हावे,” अशी इच्छा कान्हूराज महाराजांनी व्यक्त केली.
हे ऐकून देवीने प्रसन्न चित्ताने “तथास्तु” म्हटले; परंतु ती म्हणाली, “मी प्रकट रूपाने येणार नाही, तर गुप्त रूपाने येईन — आणि माझी एक अट आहे.”
“मी फक्त तुलाच दिसेन आणि तुझ्या पाठोपाठ येईन; पण तू माझ्या वचनावर विश्वास ठेवून प्रवास कर. निष्कारण शंका येऊन मागे वळून पाहू नकोस. जर तू मागे वळून पाहिलंस, तर मी जेथे असेन त्याच स्थळी वास करून राहीन, पुढे येणार नाही.”
पुढील प्रवास सुरू झाला. पुढे कान्हूराज महाराज आणि मागे रेणुका देवी चालू लागली. देवीच्या पायातील नूपुरांचा व पैंजणांचा आवाज येत होता — आणि अचानक तो आवाज बंद झाला.
त्या क्षणी कान्हूराज महाराजांनी मागे वळून पाहिले, आणि त्याच क्षणी देवी कन्हेरसर गावच्या ओढ्याच्या काठावर गुप्त झाली. तेव्हा महाराजांनी देवीची स्तुती सुरू केली आणि देवी तत्काळ प्रकट झाली. त्यांनी तिला आपल्या गावी येण्याची विनंती केली — “ये माई, ये माई” अशी विनवणी केली. यामुळेच या देवीला येथे “यमाई” हे नाव पडले.
देवीने घातलेल्या अटीप्रमाणे ती म्हणाली, “मी आता याच ठिकाणी वास करीन. ओढ्याच्या उत्तरेला घनदाट वन आहे, तिथे मी निरंतर वास करेन. या ठिकाणी मी भक्तांकडून सेवा करून घेईन आणि ज्याच्या त्याच्या भक्तीप्रमाणे प्रसन्न होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करीन. तुझीही सेवा मी याच ठिकाणी घेईन. हे ठिकाण केंदूरपासून फार दूर नाही, म्हणून तुला येथे येणे-जाणे सहज जमेल आणि पूजेत अंतर येणार नाही.”
मातेचा आदेश मानून कान्हूराज महाराजांनी कन्हेरसर येथे याच ठिकाणी देवीची मनोभावे, नित्यनियमाने पूजा केली. अशी ही रेणुका माता, अंबाबाई, जगदंबा येथे अवतीर्ण झाली. कालांतराने या ठिकाणी मंदिराची स्थापना झाली.
मंदिराची परंपरा
- येथे सकाळ-संध्याकाळ आरती होते.
- दर मंगळवारी आरतीने मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते.
- दर पौर्णिमेस देवीची पालखीतून गावात मिरवणूक निघते.
- मंदिराचा पहिला जीर्णोद्धार शके १८४७-४८ साली झाला.
मंदिरावरील शिल्प
मंदिराच्या दगडी बांधकामावर, तोंडात, शेपटीत आणि चारही पायांत हत्ती पकडलेल्या एका प्राण्याचे चित्र आहे. हेच चित्र मुरुड (महाराष्ट्र) येथील जंजिरा किल्ल्यावरही आढळते.
|| सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ||
|| शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते ||