|| श्री यमाई माता प्रसन्न ||

|| सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ||
|| शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते ||

प्रथम आदिमाया श्री. जगदंबा देवीला प्रणाम

श्री. यमाई देवस्थान, क्षेत्र कन्हेरसर येथे यमाई देवी अवतीर्ण कशी झाली?

हि कथा आहे १२०० शतकातील श्री. ज्ञानेश्वर महाराज यांच्या सानिध्यानाने पावन झालेले, केंदूर, शिरूर येथील श्री. संत कान्हूराज महाराज यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या रेणुका देवीची. समाधी अवस्थेमधे तल्लीन असताना रेणुका देवीने दर्शन दिले व वर दिला. कान्हूराज महाराज यांनी तुझे दर्शन मला सर्व सदाकाळ व्हावे ही इच्छा व्यक्त केली.

हे ऐकून देवीने प्रसन्न चित्ताने तथास्तु म्हणाली परंतू असे सांगितले कि मी प्रकट रूपाने येणार नाही तर गुप्त रूपाने येईन आणि एक अट घालती.

मी फक्त तुलाच दिसेल आणि तुझ्या पाठोपाठ येईन पण तू मात्र माझ्या वचनावर विश्वास ठेऊन तू प्रवास कर निष्कारण शंका येऊन मागे वळून पाहू नकोस, जर तू मागे वळून पाहिलंस तर मी जेथे असेल त्याच स्थळी वास करून राहील, पुढे येणार नाही. पुढील प्रवास सुरु झाला, पुढे कान्हूराज महाराज व मागे रेणुका देवी चालू लागली, देवीच्या पायातील नुपूरांचा व पैंजणांचा आवाज येत होता आणि अचानक तो आवाज बंद झाला.

या क्षणी कान्हूराज महाराज यांनी मागे वळून पहिले असता त्याच क्षणी देवी कन्हेरसर गावच्या ओढ्याच्या काठावर गुप्त झाली त्या वेळीस कान्हूराज महाराज यांनी देवीची स्तुती सुरु केली, देवी तत्काळ प्रकट झाली त्यावेळी कान्हूराज महाराज यांनी देवीला त्यांच्या गावी येण्यास विनंती, देवीला ये माई ये माई अशी विनवणी केली, याच मुळे ह्या देवीला इथे यमाई असे नाव पडले.

परंतु देवीने घातलेल्या अटी प्रमाणे देवी म्हणाली, मी आता याच ठिकाणी वास करून राहील ओढ्याच्या उत्तरेला घनदाट बन आहे तिथे मी निरंतन वास करेन. या ठिकाणी मी भक्तांकडून सेवा करून घेईन व ज्याचे त्याचे भक्ती प्रमाणे मी प्रसन्न होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करेन. तुझीही सेवा ह्याच ठिकाणी मी घेईन, हे ठिकाण केंदूर पासून फार दूर नाही म्हणून तुला इथे येणे जाणे सहज जमेल आणि पूजामधे हि अंतर येणार नाही. मातेचा आदेश मानून कान्हूराज महाराज यांनी देवीची कन्हेरसर याच ठिकाणी मनोभावे, नित्य नियमाने पूजा केली.

अशी ही रेणुका माता, अंबाबाई, जगदंबा इथे अवतीर्ण झाली. कालांतराने या ठिकाणी मंदिर स्थापन केले गेले.

येथे सकाळ संध्याकाळ आरती होते. दर मंगळवारी आरतीने मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. दर पौर्णिमेस देवीची पालखीतून गावात मिरवणूक निघते.

या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार हा शके १८४७-४८ साली झाला.

ह्या मंदिराच्या दगडी बांधकामावर असलेले तोंडात एक, शेपटी मध्ये एक व ४ पायामधे असे हत्ती पकडलेले एका प्राण्याचे चित्र आहे हेच चित्र जंजिरा, मुरुड, महाराष्ट्र किल्ल्या मध्येही आढळते.

——